वाघिणीच्या पिल्लांच्या नामकरणावरून सुरु झाला राजकीय वाद , काय आहे महापौरांचे म्हणणे ….

औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीने दिलेल्या चार बछड्यांचा नामकरण सोहळा आज, शनिवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने पार पडला. याच वर्षात २६ एप्रिल रोजी जन्मलेल्या नर बछड्याचे नाव कुश आणि तीन मादी बचड्यांची नावे अर्पिता, देविका आणि प्रगती अशी ठेवण्यात आली आहे. समृद्धी नावाच्या वाघिणीला हे चार बछडे झाले होते. या बछड्यांची नावं सुचवण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले होते. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल अडीच हजार नावे सुचवली होती. यातूनच या बछड्यांची नावे निवडण्यात आली आहेत. या नामकरण कार्यक्रमाला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. मात्र औरंगाबादेत बछड्यांच्या नामकरण सोहळ्यावरून नवा वाद सुरु झाला आहे . या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु , नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत . मात्र कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे, कोणाला नाही हा माझा अधिकार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांचे म्हणणे आहे.
इम्तियाज जलिल यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवर नाही, किंवा त्यांना या कार्यक्रमाला बोलावण्यात आले नाही , यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, कार्यक्रमात कोणाला बोलवायचे, कोणाला नाही, हे याबाबत निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार मला आहे. राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) हा महापालिकेला लागू होत नाही. महापालिकेची पत्रिका अंतिम करण्याचा अधिकार हा महापौर म्हणून पूर्णपणे माझा आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल पाळणे हे महत्त्वाचे असते ते आम्ही पाळलेले आहे. दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत युतीची सत्ता आहे. शिवसेना नेते नंदकुमार घोडेले हे महापौर आहेत. त्यामुळे बछड्यांच्या नामकरण सोहळ्याला माजी खासदारांना बोलवण्यात आले.