राज्यात विविध ठिकाणी दोन दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा अंदाज

राज्यात सर्वच ठिकाणची तापमानवाढ कायम असून, विदर्भ आणि मराठवाडय़ातील उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी पुढील दोन दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ढगाळ स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी तापमानात घट झाली होती. मात्र, कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत पुन्हा वाढले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ नोंदविली गेली. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढले आहे. कोकण विभागातही कमाल तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. इतर ठिकाणचे तापमान ४२ ते ४५ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडय़ात परभणीचे तापमान ४५.६ अंशांवर गेले असून, इतर ठिकाणीही तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मालेगावात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. पुण्याचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. महाबळेश्वरचे तापमानही सरासरीच्या तुलनेत तब्बल ६ अंशांनी वाढले आहे. कोकण विभागात मुंबई, अलीबाग, रत्नागिरीतील तापमानही सरासरीच्या तुलनेत काहीसे पुढे गेले आहे.