भाजप आमदाराने आधी लाथाडले , मग माफी मागितली आणि मग पत्रकार परिषदेतच राखी बांधून घेतली !!

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी नीतू तेजवानींना मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले नरोदातील भाजप आमदार बलराम थवानी यांनी त्यांची माफी मागितली आहे. नीतू या माझ्या बहिणीसमान आहेत. मी त्यांची माफी मागितली आहे, असं सांगून थवानी यांनी त्यांच्याकडून राखी बांधून घेतली.
नीतू तेजवानी या स्थानिक समस्या घेऊन आमदार थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. समस्या सोडवली नाही तर कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याचवेळी वाद झाला आणि थवानी यांनी नीतू यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चहुबाजूंनी थवानी यांच्यावर टीका होऊ लागली. अखेर या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न थवानी यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नीतू यांची जाहीर माफी मागितली आहे. आमच्यातील सर्व गैरसमज दूर झाले आहेत. त्या माझ्या बहिणीसमान आहेत. काल जे काही झालं त्याबद्दल मी माफी मागतो. भविष्यात त्यांना जी काही मदत लागेल ती मी करील, असं आश्वासन थवानी यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी नीतू यांच्याकडून पत्रकार परिषदेतच राखी बांधून घेतली.