बजरंग दल सशस्त्र प्रशिक्षण , संयोजक म्हणतात, बंदुका नव्हे त्या एअर गन !!

बजरंग दलातर्फे मिरा रोड येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ‘शौर्य प्रशिक्षण वर्ग २०१९’ हे शस्त्रप्रशिक्षण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर झळकल्यानंतर बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेने पोलिसांकडे रितसर तक्रार केली आहे. बजरंग दलाने मात्र शस्त्र प्रशिक्षण झाल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे.
या शिबिरामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र प्रशिक्षण दिले नव्हते, असे कोकण विभागाचे बजरंग दलाचे समन्वयक संदीप भगत यांनी म्हटले आहे. हे आरोप म्हणजे राजकीय खेळी असल्याचा दावा त्यांनी केला. आमच्या काही कार्यकर्त्यांनी एअरगन आणल्या होत्या, त्यासाठी परवाना आवयक नसतो, अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या प्रकरणी आम्ही आयोजकांशी संपर्क साधला असून त्यांना शस्त्र परवाने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत येथे एअर गनचा वापर झाल्याचे आढळले, असे पोलिस उपविभागीय अधिकारी अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
मिरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेत विद्यार्थ्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर एकच खळबळ माजली आहे. प्रशांत गुप्ता नावाच्या युवकाच्या फेसबुक अकाऊंटवर शस्त्रप्रशिक्षण कार्यशाळेचे फोटो झळकळल्यानंतर डीएफआय या सामाजिक संस्थेने नवघर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रशांत गुप्ता याच्या फेसबुक अकाऊंटवर हे प्रशिक्षण २५ मे १ जूनपर्यंत चालणार असल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. त्यामध्ये छायाचित्रात अनेक तरुण रायफल प्रशिक्षण घेत असल्याचे दिसत होते. त्यामध्ये अनेक जण अल्पवयीन असल्याचे मत संस्थेचे सचिव अॅड. संजय पांडे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बजरंग दल तसेच शाळेवरही कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.