मुख्यमंत्र्यांनी घेतला पूर्व मान्सून परिस्थितीचा आढावा

मुंबई आणि महाराष्ट्रातील पूर्वमान्सून तयारीचा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीतून आढावा घेतला. मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल, एनडीआरएफ, कोस्टगार्ड, भारतीय हवामान विभाग, एसआरपीएफ, पोलिस, रेल्वे आणि राज्य सरकारचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व महापालिकांचे आयुक्त सुद्धा यावेळी उपस्थित होते.
मान्सून आगमनाच्या सर्व शक्यता आणि त्याची पुढच्या काळातील संपूर्ण वाटचाल याचे सविस्तर सादरीकरण भारतीय हवामान विभागाच्या अधिकार्यांनी या बैठकीत केले. एनडीआरएफच्या अधिकार्यांनी त्यांच्या तयारीचे तर इतरही विभागांनी त्यांच्या तयारीचे सादरीकरण यावेळी केले. विभागीय आयुक्तांनी आपआपल्या विभागात करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.
मान्सूनच्या काळात एखादी घटना घडल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्याचा दृष्टीकोन बाळगण्यापेक्षा आधीच सावधगिरीच्या उपाययोजना आखण्यात याव्यात, असे सांगताना विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. मुंबईसोबतच नाशिक आणि नागपूर येथील अलिकडचा अनुभव पाहता तेथेही प्रशासनाने सतर्क असावे. नागरिकांना आपातकालिन स्थितीसाठी जे हेल्पलाईन नंबर्स देण्यात येतील, तेथील यंत्रणा तत्काळ प्रतिसाद देणारी असावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ पूर्वानुभावावर विसंबून राहण्यापेक्षा संस्थात्मक ज्ञानाधारित आणि दूरदृष्टी ठेवत उपाययोजना करणे अधिक संयुक्तिक ठरेल. एकही अनुचित घटना या काळात घडणार नाही, अशी खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.