Pubg Madness : १८-१८ तास पबजी खेळण्याच्या वेडात १६ वर्षीय तरुणाचा झाला मृत्यू

पबजी गेमनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलंय. या वेडापायी अनेकांनी जीवही गमावला आहे. मध्य प्रदेशातील निमचमध्येही एका १६ वर्षीय मुलाला सलग सहा तास पबजी खेळल्यानं हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. फुर्कन कुरेशी असं मृत मुलाचं नाव आहे. पबजी खेळत असतानाच तो मोठ्मोठ्यानं ओरडू लागला आणि हृदयविकाराचा झटका येऊन तो खाली कोसळला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती त्याचे वडील हारुन रशिद कुरेशी यांनी दिली. २८ मे रोजी ही घटना घडली.
फुर्कन आणि त्याचे कुटुंबीय नातेवाईकांच्या घरी लग्नसोहळ्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर फुर्कन पबजी खेळण्यात गुंग झाला होता. त्याची बहीण फिजाही त्याच्या बाजूलाच बसली होती. गेम खेळता खेळता फुर्कन अचानक ‘ब्लास्ट करा, ब्लास्ट करा’ असा जोरजोरात ओरडू लागला. त्यानंतर त्यानं रागानंच इअरफोन काढले. मोबाइल जमिनीवर फेकून दिला आणि ढसाढसा रडू लागला. ‘अयान, मी आता तुझ्यासोबत खेळणार नाही. तुझ्यामुळं मी हरलो’, असं तो म्हणत होता, असं फिजानं सांगितलं. फुर्कन हा पबजीच्या पूर्णपणे आहारी गेला होता. कधी-कधी दिवसातील १८ तास तो फक्त पबजी गेम खेळायचा, अशी माहिती त्याचा भाऊ मोहम्मद हासिम यानं दिली. ‘व्हिडिओ गेम खेळता खेळता अतिउत्साहाच्या भरात त्याच्या हृदयाचे ठोके वाढले असावेत आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा,’ असा प्राथमिक अंदाज डॉ. अशोक जैन यांनी व्यक्त केला.