Modi Sarkar 2 : विकास दराचा निच्चांक आणि बेरोजगारीचा उच्चांक, सरकारसमोरील मोठे आव्हान

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारला पहिल्याच दिवशी आर्थिक पातळीवर मोठा झटका बसला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित आर्थिक विकासदर ६ टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहित देशाचा आर्थिक विकासदर ५.८ टक्के इतका होता.
एकीकडे आर्थिक विकासदर (जीडीपी) घसरला असताना दुसरीकडे बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील बेरोजगारीची आकडेवारी समोर आली आहे. २०१७-१८मध्ये बेरोजगारी ६.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या ४५ वर्षातील ही देशातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. १९७२-७३नंतर प्रथमच बेरोजगारीचा आकडा ६ टक्क्यांवर पोहोचला आहे. हीच आकडेवारी जानेवारीत लिक झाली होती.
गेल्या आर्थिक वर्षातील अखेरच्या आणि चौथ्या तिमाहिच्या आकडेवारीचा परिणाम आर्थिक विकासदरावर झाला आहे. आर्थिक विकासदर (GDP) ७ टक्क्यांच्याही खाली जाऊन ६.८ टक्क्यांवर आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात जानेवारी ते मार्चदरम्यानचा विकासदर हा ८.१ टक्के होता. तर वार्षिक विकासदर हा ७.२ टक्के इतका होता. म्हणजेच २०१७-१८ च्या तुलनेत २०१८-१९मध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहित आर्थिक विकासदर २.३ टक्क्यांनी घसरला आहे. तर वार्षिक विकासदरात ०.४ टक्क्यांची घट झाली आहे.