दिल्लीतील शालेय अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील धड्याचा समावेश

दिल्लीतील शालेय अभ्यासक्रमात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील धड्याचा समावेश करण्यात येणार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्र्याने स्पष्ट केलं आहे. दिल्लीचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या सामाजिक आंदोलनावर आधारित एका धड्याचा लवकरच अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे, असं ट्विट राजेंद्र पाल गौतम यांनी केलं आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज कधीच इतिहास घडवत नाही. त्यामुळे बाबासाहेबांचा संघर्ष शिकवण्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला आहे.