सावरकरांना भारतरत्न द्या आणि नोटेवरचा गांधींचा फोटो काढून सावरकरांचा टाका , हिंदू महासभेची मागणी

सावरकर जयंतीचं औचित्य साधून अखिल भारतीय हिंदू महासभेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. तसेच भारतीय चलनातील नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो हटवून वीर सावरकरांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. सावरकर जयंतीनिमित्त मेरठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडीत अशोक शर्मा, प्रदेश प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी संयुक्तपणे वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने गौरवून सरकारने त्यांचा सन्मान करावा अशी मागणी केली आहे. तसेच चलनातील नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो हटवून सावरकरांचा फोटो लावण्याचीही मागणी केली आहे. देशप्रेमासाठी निस्वार्थपणे वीर सावरकर यांनी आयुष्य खर्च केले हे कोणी नाकारू शकत नाही असं हिंदू महासभेतील नेत्यांनी सांगितले.
या आधी सावरकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सावरकरांना अभिवादन केले होते . सावरकर यांनी अनेकांना राष्ट्र निर्माणासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. वीर सावरकर हे भारतासाठी मजबूत, धाडसी आणि देशभक्तीचं प्रतिक आहे असं मोदींनी म्हटलं होतं .