नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात ११ जवान जखमी

गेल्या काही दिवसांपासून नक्सली कारवायात वाढ झाली असून झारखंडमधील सरायकेला येथे नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात ११ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना हेलिकॉप्टरने रांची येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सरायकला येथे मंगळवारी पहाटे कोब्रा फोर्स आणि झारखंड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जंगलात विशेष मोहीम राबवली. यादरम्यान नक्षलींनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. सकाळी पाचच्या सुमारास हा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात कोब्रा फोर्समधील ८ जवान आणि झारखंड पोलीस दलातील तीन जवान जखमी झाले. जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांमध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये नक्षलींच्या कारवाया वाढल्या आहेत. दंतेवाडा जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी नक्षलवादी हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या गाडीत सुरक्षा दलातील चार जवानही होते. ते देखील या हल्ल्यात शहीद झाले होते. यानंतर १ मे रोजी नक्षलींनी गडचिरोलीत भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. तर खासगी वाहनाच्या चालकाचाही यात मृत्यू झाला होता. १ मे रोजी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार १५ जवान घटनास्थळाच्या दिशेने जात असताना जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात हे जवान शहीद झाले होते.