मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीला साथ दिली असती तर महाराष्ट्रात आज वेगळे चित्र दिसले असते : प्रकाश आंबेडकर

मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीला साथ दिली असती तर महाराष्ट्रात आज वेगळे चित्र दिसले असते . अकोला , सोलापूर , नांदेड , हिंगोली , माढा या मतदार संघात मुस्लिम मतदार वंचित आघाडी पासून दूर गेला गेला आणि काँग्रेसकडे वळाला. औरंगाबाद मध्ये मात्र वंचित आघाडी इम्तियाज च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि रिझल्ट मिळाला अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी आज ताक या वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, आमच्या उमेदवारांनी बहुसंख्य मतदारसंघात लक्षणीय मते मिळवली आहेत. वास्तविक आमचे नियोजन विधानसभा निवडणुकीचे होते. लोकसभेचे नव्हते परंतु काँग्रेसने युती कारण्या संसदर्भात उशीर केला त्यामुळे आम्हाला ४८ मतदारसंघात लढावे लागले. आम्ही कधीही अवास्तव जागा मागितल्या नाही. काँग्रेसकडे अनेक उमेदवारही नव्हते आणि ज्या जागा ते हरत आले आहेत त्या १२ जागा आम्हाला द्याव्यात अशी होती,पण त्याचा निर्णय काँग्रेसने घेतला नाही. यात चूक त्यांची आहे.
पराभवाचे विश्लेषण करताना आंबेडकर म्हणाले, अकोला आणि सोलापूर या दोन्हीही मतदारसंघात मुस्लिमांची मते”फतव्यांमुळे”काँग्रेसकडे गेली याचा अंदाज आपल्याला या दोन्हीही मतदार संघात आला होता , त्यामुळे माझा पराभव झालाशिवाय ३० टक्के मते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसेनेकडे गेली. इतर हिंगोली, सांगली, नांदेड,माढा या मतदारसंघातही मुस्लिम मतदार काँग्रेसकडे गेले. औरंगाबाद मध्ये मात्र वंचित आघाडी इम्तियाज च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि रिझल्ट मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने हे लक्षात घ्यावे कि, वंचित बहुजन आघाडीचं भाजप सेनेला सशक्त पर्याय आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसकडे न जाता वंचित बहुजन आघडीचा पर्याय निवडावा.
आता काँग्रेसला युती करायची असेल तर सामान पातळीवर करावी लागेल
लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढून काँग्रेसला अनेक जागांवर धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढंही स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. ‘यापुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल,’ असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एमआयएमसह छोट्या पक्षांची मोट बांधून प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं खेचली आहेत. इम्तियाज जलील यांच्या रूपानं ‘वंचित’चा एक खासदार निवडून आला आहे. तर, या आघाडीला मिळालेल्या मतांमुळं महाराष्ट्रात काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीचा प्रभाव काँग्रेसनंही मान्य केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आज ट्विट केलं असून यापुढंही काँग्रेसशी स्वत:च्या अटींवर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. ‘काँग्रेसचे राजकीय गुलाम होऊन राहण्याची वेळ गेली आहे. आता त्यांना आमच्याशी समसमान पातळीवर येऊन चर्चा करावी लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी चर्चा करण्याची वेळ आल्यास प्रकाश आंबेडकर १४४ जागांची मागणी करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.