MH 12 RK 6951 : शनिशिंगणापूर फाट्याजवळ बोलेरो जीप ट्रकवर आदळली , २ ठार , ६ जखमी , अपघातग्रस्तांची माहिती मिळेना ….

शनिशिंगणापूर फाटाजवळ अहमदनगर-मनमाड महामार्गावर बोलेरो जीप मालट्रकवर आदळून झालेल्या अपघातात बोलेरोमधील चालकासह एक प्रवासी असे दोन जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले असून, नगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी व्यक्ती बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने ठार व जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. गाडीत सापडलेल्या कागदपत्रांवरून सर्व जण पुणे येथील असावेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. गंभीर जखमीमध्ये दोन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. रविवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
बोलेरोमधील सर्व जण शनिशिंगणापूरला दर्शनासाठी जात होते. बोलेरो जीप (एमएच १२ आरके ६९५१) ही राहुरीकडे जात असताना गाडीचे टायर फुटून डिव्हिडरवरून आदळून दुसऱ्या बाजूला जावून ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला. त्यात बोलेरो गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. बोलेरोचा चालक जागीच ठार झाला. गाडीतील सात जण गंभीर जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी नगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. इतर सहा जण गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडीतील कोणीच नावे सांगण्याच्या परिस्थितीत नसल्याने ठार झालेले व जखमींचे नावे समजू शकले नाहीत.