Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या पुनाळेकर व भावे यांना १ जूनपर्यंत कोठडी

Spread the love

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आलेले ‘सनातन संस्थे’चे वकील संजीव पुनाळेकर व त्यांचे सहकारी विक्रम भावे या दोघांनाही पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयानं १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. पुनाळेकर व भावे या दोघांना सीबीआयनं मुंबईतून अटक केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप या दोघांवर आहे. दाभोलकर हत्या प्रकरणी खटल्यात आरोपींच्यावतीने संजीव पुनाळेकर व त्यांचा सहकारी भावे हे न्यायालयात बाजू मांडत आहेत.
नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात ते मॉर्निंग वॉक करत असताना जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याआधारे पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असेल्या शरद कळसकरच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव पुढे आले होते.
पुनाळेकर हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव व ‘सनातन’च्या कार्यकर्त्यांचे वकील म्हणून काम करतात. तर, भावे हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील थिएटरमध्ये ४ जून २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विक्रमला दोषी ठरवण्यात आले होते. त्याला १० वर्षांची शिक्षा झाली होती. तो जामिनावर होता. भावे यानं घटनास्थळाची रेकी केली आणि दाभोलकरांची ओळख पटवण्याचं काम केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!