West Bengal : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने राजीनामा देण्याची इच्छा : ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने निराश झालेल्या तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ममतादीदींनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला. तशी माहितीच त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणुकीच्या काळात केंद्रीय दलाने आमच्याविरोधात काम केलं. पश्चिम बंगालमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली गेली. हिंदू-मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचं राजकारण झालं. त्यामुळे मतं विभागली गेली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र त्याचं काहीच झालं नाही असं ममतादीदींनी सांगितलं.
सध्या लोकशाहीत धनशक्तीनं डोकंवर काढलं आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्रीपदी म्हणून काम करण्याची इच्छा राहिलेली नाही, असं सांगून त्या म्हणाल्या की, सर्व राज्यांमध्ये विरोधकांचे उमेदवारच निवडून येऊ नयेत, असं कसं होऊ शकतं? राजीव गांधी यांनी सुद्धा घवघवीत यश मिळवलं होतं. पण ते यश कधी संशयास्पद वाटलं नाही, आजच असं का वाटतयं?
मोदींनी शपथविधी सोहळ्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधानाला निमंत्रण दिलं. ते लोक दुसऱ्यांना पाकिस्तानी म्हणून हिणवू कसे शकतात?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री म्हणून माझा छळ होतोय असं मला वाटतंय. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदी रहायचं नाही, असं त्या म्हणाल्या. तुम्हाला पराभव मान्य आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर काँग्रेसप्रमाणे मी शरणागती पत्करणार नाही, असं त्या म्हणाल्या.