२०१९ च्या लोकसभेत निर्वाचित मुस्लिम खासदारांचा टक्का आहे तरी किती ?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता सोपवली आहे. या वेळी विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी मुस्लीम मते मिळण्याचे जोरदार प्रयत्न केले. याच कारणामुळे २०१४ च्या तुलनेत या वेळी संसदेत जाणाऱ्या मुस्लीम खासदारांची संख्या वाढली आहे. यंदा एकूण २७ मुस्लीम खासदारलोकसभेत पोहोचले आहेत. २०१४ मध्ये मुस्लीम खासदारांची संख्या होती २३. उत्तर प्रदेशात सप-बसपची आघाडी यशस्वी झाली नसली, तरी ही आघाडी उत्तर प्रदेशातून ६ मुस्लीम खासदारांना निवडून देण्यात मात्र यशस्वी झाली आहे.
२०१४ मध्ये उत्तर प्रदेशात एकही मुस्लीम खासदार नव्हता. या वेळी मात्र, रामपूरमधून सपचे आझम खान, अमरोहामधून बसपचे कुंवर दानीश अली, गाजीपूरमधून बसपचे अफझल अन्सारी, मुरादाबादमधून डॉ. एस. टी. हसन, सहारनपूरमधून हाजी फजलुर्रहमान आणि संभलमधून सपचे डॉ. शफीकुर्रहमान बर्क विजयी झाले.
आसाममधून २ मुस्लीम खासदार संसदेत गेले आहेत. एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल आपली खासदारकी वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत, तर आसाममधून अब्दुल खालिक यांचाही विजय झाला आहे. या बरोबरच केरळमधून दोन, तर पश्चिम बंगालमधून ४ मुस्लीम खासदारांचा विजय झाला आहे. यात रुही, खलीलुर्रहमान, साजिद खान आणि अबू ताहिर यांचा समावेश आहे.
तेलंगणमधील हैदराबादमधून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मताधिक्याने विजय संपादन केला. तर महाराष्ट्रातील औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनीही विजय संपादन केला आहे. तसेच, लक्षद्वीपमधून मोहम्मद फैजल, पंजाबमधून मोहम्मद सादिक आणि जम्म-काश्मीरमधून फारुख अब्दुल्लांसह ३ मुस्लीम उमेदवार संसदेत गेले आहेत.
एनडीएचा केवळ एक मुस्लीम उमेदवार विजयी झाला आहे. बिहारमधून महमूद अली कैसर जेडीयूच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. तर, तामिळनाडूमध्ये इंडियन यूनियन मुस्लीम लीगच्या तिकिटावर नवाझ कानी विजयी झाले आहेत.
मागच्या ४ लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली असता सर्वाधिक मुस्लीम उमेदवार २००४ मध्ये विजयी झाल्याचे दिसते. २००४ च्या निवडणुकीत ३४ मुस्लीम उमेदवार, २००९ मध्ये ३० आणि २०१४ मध्ये २३ मुस्लीम उमेदवार संसदेत पोहोचले होते. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वात जास्त मुस्लीम खासदार १९८० मध्ये बनले होते. त्या वेळी मुस्लीम खासदारांची संख्या होती ४९.