Exit Poll : सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीवर : पुन्हा मोदी सरकार !!

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले असून त्यातून भाजप आणि एनडीएसाठी अनुकूल कल पुढे आले आहेत. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार, असा अंदाज मतदानोत्तर सर्वेक्षणांमधून पुढे येत असून सर्व एक्झिट पोलची सरासरी पाहता एनडीएला ३०४ जागा, यूपीएला ११८ तर अन्य पक्षांना १२० जागा मिळतील, असा अंदाज आहे.
टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मोदीलाट कायम असल्याचे चित्र मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये दिसत असून मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी केलेली एकजूट तितकीशी प्रभावी ठरलेली नाही, असे साधारण चित्र आहे.
टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ५४२ पैकी ३०६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बहुमताचा २७२ हा जादुई आकडा एनडीए सहज पार करेल, असे चिन्ह आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा प्रभाव पाडता आलेला नाही, असे दिसत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत सत्ता खेचून आणणाऱ्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत तो करिष्मा दाखवता आलेला नाही, असे हे सर्वेक्षण सांगत असून यूपीएला १३२ जागांपर्यंतच मजल मारता येईल, असे दिसत आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलमध्य अन्य पक्षांना १०४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.