प्रज्ञासिंह ठाकूर भगवी वस्त्रं घालून हिंदूंचा अपमान करत असल्याचा स्वरा भास्करचा आरोप

मी भगवी साडी नेसले तर मी साध्वी स्वरा भास्कर होईन का? असा प्रश्न विचारत भोपाळच्या एका पत्रकार परिषदेत अभिनेत्री स्वरा भास्करने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. मला ढोंगी लोकांची भीती वाटत नाही. मला असं अजिबात वाटत नाही की भगवी वस्त्रे परिधान केल्यावर तुमच्यात काहीतरी वेगळी शक्ती येते. प्रज्ञासिंह ठाकूर भगवी वस्त्रं घालून हिंदूंचा अपमान करत असल्याचाही आरोप स्वराने केला. प्रज्ञासिंह ठाकूर यांना तिकिटच कसे मिळते? दिग्विजय सिंह हेच चांगले उमेदवार आहेत आणि राहुल गांधी हे चांगले पंतप्रधान होऊ शकतात असेही मत स्वरा भास्करने व्यक्त केले.
एक हिंदू असल्याने मला वाईट वाटते की माझ्या धर्माच्या नावाखाली हिंसा घडते. लोक रामाचे नाव घेतात आणि गुन्हे करतात आणि पुन्हा जय श्रीरामच्या घोषणा देतात याचेही मला खूप वाईट वाटते असेही यावेळी स्वरा भास्करने म्हटले आहे. रामाचे नाव घेऊन गुन्हा करणारे लोक हिंदू धर्माचा अपमान करत आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिलीच कशी? त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे असंही स्वरा भास्करने म्हटलं आहे.
हिंदू दहशतवाद तुम्ही मानता का? असा प्रश्न स्वरा भास्करला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हटली की हिंसा, दहशतवाद, गुन्हेगारी हे सगळं पाप आहे असं मी मानते. एवढंच नाही तर या सगळ्या गोष्टी कुणीही करू शकतं. त्यासाठी हिंदूच असलं पाहिजे किंवा मुस्लिमच असलं पाहिजे असं काही नाही. हिंदू दहशतवाद, मुस्लिम दहशतवाद ही फक्त देण्यात आलेली नावं आहेत असंही मत स्वरा भास्करने मांडलं. काँग्रेसला तुम्ही मानत आहात त्यांचा जाहीरनामा वाचलात का? असा प्रश्न विचारल्यावर स्वरा म्हटली होय मी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला आहे आणि माझा त्या जाहीरनाम्याला पाठिंबा आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जाहीरनामा असला पाहिजे असंही स्वरा भास्करने म्हटलं आहे.