राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असा प्रश्न होता , बोलण्याचा विपर्यास केला : शरद पवार

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी त्यांच्यासोबत कन्या सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. मतदानानंतर शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, देशात स्थिर सरकार असणे गरजेचे आहे. यासाठी संसदेत एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाठवणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे वृत्त रविवारी प्रकाशित झाले होते. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बहुमत मिळवण्यास अपयशी ठरली, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असे विधान शरद पवार यांनी केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. यावरही शरद पवार यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले. राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी महाआघाडीकडे आणखी कोणते नेते आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांचे नाव घेतले. पण वृत्तपत्राने छापलेल्या मुलाखतीत माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे शरद पवार यांनी सांगितले.