“द ग्रेट खली” च्या प्रचाराला तृणमूल काँग्रेसचा आक्षेप , विदेशी नागरिकाला निवडणूक प्रचार करता येत नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने डब्ल्यूडब्ल्यूई स्टार दिलीपसिंह राणा ‘द ग्रेट खली’ च्या प्रचारात उतरण्याला हरकत घेतली असून ‘द ग्रेट खली ‘ अमेरिकन नागरिक असल्याने त्याला भारतीय निवडणुकीत प्रचार करता येत नाही अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे . खलीने जादवपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनुपम हाजरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणुकीत हजेरी लावली होती. त्यावर तृणमूल काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.
भारतीय कायद्यानुसार कुठलीही विदेशी व्यक्ती भारतातील निवडणुकीत प्रचारामध्ये सहभागी होऊन मतदारांना आकर्षित करू शकत नाही’, असे तृणमूलने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, खलीने अनुपम हाजरा यांच्या प्रचारात भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत खली अग्रभागी होता. यावेळी अनुपम माझा मित्र आहे. आमची मैत्री पक्षीय राजकारणापलीकची आहे, असे खलीने यावेळी स्पष्ट केले होते. देश कणखर बनवण्यासाठी आणि प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचेही खली म्हणाला होता.