देशाच्या नकली चौकीदाराला हटविण्यासाठी मी वाराणसीतून निवडणूक लढवत आहे : फौजी तेज बहादूर यादव

सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळे देशातील जवानांचे मॉरल डाऊन झाले आहे. विदेशातही सैन्याची बदनामी झाली आहे म्हणूनच देशाच्या नकली चौकीदाराला हटविण्यासाठी मी वाराणसीतून निवडणूक लढवत असल्याचे बीएसएफचे बडतर्फजवान तेज बहाद्दूर यांनी म्हटले आहे. हरयाणाचे मूळ रहिवासी असलेले तेज बहादूर वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाआव्हान देण्याचे काम तेज बहादूर यांनी केले आहे.
देशाच्या काना-कोपऱ्यातून मला पाठींबा देण्यासाठी जवान येत आहेत. आता, संसदेतही देशाचे जवान जायलाच हवेत, असे म्हणत तेज बहादूर यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. पंतप्रधान मोदींच्या नावाची भीती अनेक देशांना बसलीय किंवा दहशतवाद्यांमध्ये मोदींचा दरारा आहे, याबाबत तेज बहादूर यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावरही तेज बहादूर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्रांमध्ये किंवा विदेशात मोदींची भीती असते, मोदींचा दरारा असता, तर पुलवामाचा हल्ला झालाच नसता. मोदींचा धाक बसला असता, तर पुलवामा हल्ला झालाच नसता.
जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांनीही पुलवामा हल्ल्यासंदर्भात चूक झाल्याचे मान्य केले. मग, या घटनेची चौकशी का होत नाही. अजित डोवाल हे मोदींचे खास आहेत, मग ते काय करत होते. तुम्हाला माहिती मिळाली होती, तरीही हा हल्ला झालाच कसा? असा प्रश्न तेज बहादूर यांनी विचारला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे 7 व्या टप्प्यात 19 मे रोजी वाराणसी मतदारसंघात मतदान होत आहे. त्यासाठी तेज बहादूर यांनी चांगलीच तयारी केली आहे. आपल्या सैन्यातील मित्रांसमेवत ते वाराणसीत तळ ठोकून बसले आहेत. तसेच, वाराणसीतील सर्वसामान्य लोकांच्या भेटीगाठी देऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. सैन्य दलातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केल्याचे तेज बहाद्दूर यांनी सांगितले.
दरम्यान, 2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. तेज बहादूर यांचे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती. बहादूर यांच्याकडे दोन मोबाईल बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच सैन्याच्या गणवेशात असताना सोशल मिडियावर फोटो टाकल्याने सैन्याचे नियम तोडल्याचा आरोप ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.