देशात परिवर्तन हवे असेल तर काँग्रेसला नव्हे , वंचित आघाडीला मतदान करा : प्रकाश आंबेडकर

प्रारंभी निवडणूक लढविण्याची हवा निर्माण करीत, कॉग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी चौकशीच्या भितीने वाराणसीतून माघार घेतली. याद्वारे त्यांनी कॉग्रेसच्या पराभूत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. सरकारी यंत्रणा आपली देखील चौकशी करतील या भितीने प्रियंका गांधी यांनी वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणुकीतून माघार घेतली. कॉंग्रेस पक्ष पराभूत मानसिकतेत वावरत आहे. त्यांना मतदान करु नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या प्रचारासाठी आज वडाळा येथे जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नाशिक मतदारसंघात शिवसेना आणि वंचित आघाडी यांच्यात खरी लढत होणार आहे. वाराणसीतून माघार घेणाऱ्या पराभूत मानसिकतेच्या कॉग्रेसला मतदान देउन वाया घालवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुलमी सरकार पायउतार करण्यासाठी एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्या.
यावेळी अल्पसंख्यांक समुदायाला आवाहन करतांना ते म्हणाले, देशातील जुलमी भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी अल्पसंख्यांकांनी डोळे उघडे ठेउन मतदान करावे. या समाजातील जुन्या पिढीचे काही जण मोदींना सत्तेतून पायउतार करण्यासाठी डोळे बंद करुन कॉग्रेसकडे डोळे लावून बसले आहेत. मुस्लिम समाजातील तरुण समंजस आहे, जो वंचित बहुजन आघाडीसोबत सक्रिय आहे. त्यामुळे जुन्या जाणत्या मुस्लिमांनी आता डोळे उघडे ठेऊन मतदान करावे. देशात पंतप्रधान मोदी सरकार सत्तेत कायम ठेवायचे असेल तरच, कॉग्रेसला मतदान करा. पण परिवर्तन हवे असेल तर, वंचित आघाडीला मतदान करावे. एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी आज पुन्हा सभेला दांडी मारली. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले.