पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भव्य रोड शो करून करणार उमेदवारी अर्ज दाखल , एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

देशभरातील अर्धा प्रचार आटोपल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीतून उद्या 26 एप्रिलला दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी होणाऱ्या रोड शो साठी आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एनडीएतील विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत . भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मेगा रोड शोचे आयोजन केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधकांना मोदी लाट आजही कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जाणार आहे.
पक्षाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतल्या बाबतपूर विमानतळावर उतरणार असून विमानतळावरून मोदी थेट बनारस हिंदू विश्वविद्यालयात जाणार आहेत. तिथे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर मोदींचा रोड शो सुरू होणार आहे.
पीएम मोदींच्या मेगा रोड शोमध्ये भाजपाचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. हा रोड शो बीएचयूपासून दशाश्वमेध घाटापर्यंत होणार आहे. गेल्या निवडणुकीतही मोदींनी याच ठिकाणावरून रोड शो केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी गंगा आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. मोदींच्या रोड शोमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, सुषमा स्वराज, पीयूष गोयल, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानही या रोड शोला उपस्थित राहणार आहेत. या रोड शोसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आले असून, रोड शोदरम्यान मोदींवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाणार आहे. हा रोड शो सात किलोमीटरनंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या द्वाराजवळ संपेल. रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दशाश्वमेद घाटावर गंगा आरतीत सहभागी होणार आहेत. गंगा आरतीनंतर मोदी काशी विश्वनाथाचे दर्शन करणार आहेत.