नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, ते फकीर नव्हे बेफिकीर : राज ठाकरे यांच्या पोलखोलमुळे भाजप त्रस्त

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांमधून नरेंद्र मोदी , अमित शहा आणि भाजपची चांगलीच पोलखोल होत असल्याने भाजप त्रस्त झाली आहे . आजच्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत याचा दाखल देण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला व्हिडीओ वापरला . या व्हिडिओमध्ये अंबानी यांनी दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीचे समर्थन करून मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तोच धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी मिलिंद देवरांचे समर्थन केले. मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंचे जिवलिग मित्र आहेत.
या सभेत राज यांनी प्रथम मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शहीद जवानांच्या नावाने मत मागणारे आमचे PM हे फकीर नसून बेफिकिर असल्याची बोचरी टीका राज यांनी केली. मुंबईतल्या पहिल्याच सभेत राज यांनी शिवसेनेला देखील मतदान करू नका असे आवाहन केले. कारण सेनेला मतदान म्हणजे मोदी-शहा यांना मत असे राज यांनी सांगितले.
आपल्या धडाकेबाज भाषणात राज ठाकरे म्हणाले कि , मुकेश अंबांनीनी मिलिंद देवरांचे केलेले समर्थन हा दक्षिण मुंबईपुरता विषय मर्यादीत नाही. हा देशासाठी एक संदेश आहे. भाजपाचे सरकार जाणार, मोदी पंतप्रधान होणार नाहीत हा त्या मागचा अर्थ आहे.
‘मोदी है तो मुमकिन है’ जाहीरातीची पोलखोल : कुटुंबाला बोलावले स्टेजवर !!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काळचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानातील सभेमध्ये ‘मोदी है तो मुमकिन है’ या जाहीरातीची पोलखोल केली. या जाहीरातीमध्ये मोदींसोबत एका कुटुंबाचा फोटो दाखवला आहे. या संपूर्ण कुटुंबालाच राज ठाकरे यांनी मंचावर आणले व भाजपाच्या जाहीरातीचे पितळ उघडे पाडले.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, भाजपावाले माझे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढलेले व्हिडीओ बाहेर काढत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी ते चुकले म्हणून त्यांचे वाभाडे काढले, आता हे सत्तेत हे वाट लावत आहेत, म्हणून ह्यांचे वाभाडे काढत आहेत, माझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं भाजपाकडे नाहीत म्हणून अशाप्रकारे भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. सध्याच्या भाजपचे मूळपुरुष नरेंद्र मोदी हे इतकं खोटं बोललेत की भाजपच्या लोकांनाच कळत नाहीये की ह्याला तोंड कसं द्यायचं. भाषणांमध्ये २,३ दिवसांची गॅप घेतली, म्हणलं मुख्यमंत्र्यांना जरा झोप घेऊ देत. मुख्यमंत्री पण भांबावलेत, त्यांना काही कळत नाहीये की ह्याला कशी उत्तर द्यायची असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
या कुटुंबाने भाजपाच्या जाहीरातीत काम केले नव्हते. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. भाजपाच्या आयटी सेलवाल्यांनी हा फोटो क्रॉप करुन मोदींच्या फोटोसोबत जोडला व ‘मोदी है तो मुमकिन है’ जाहीरातीसाठी वापरला. हे फक्त एक उदहारण आहे. अशा कितीतरी अजून अशा गोष्टी असतील. भाजपाच्या आयटी सेलकडून खोटया बातम्या पेरल्या जात आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे देशावरचे संकट असून कोणत्याही परिस्थितीत हे दोघे देशाच्या राजकीय क्षितीजावर दिसता कामा नयेत. यासाठी शिवसेनेला देखील मतदान करू नका कारण सेनेला मतदान म्हणजे या दोघांना मत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आवाहन केले. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये सभा घेतल्यानंतर राज यांची मुंबईतील पहिली सभा दक्षिण मुंबईच्या काळाचौकी भागातील शहीद भगतसिंग मैदानात झाली.