मुस्लिम समाजाला एकजूटीने भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन, सिद्धूची केली बोलती बंद !!

काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धूयांना मुस्लिम समाजाला एकजूटीने भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन भोवलं आहे. हे आवाहन केल्याबद्दल सिद्धू यांच्यावर निवडणूक आयोगाने ७२ तासांची म्हणजे तीन दिवसांची प्रचारबंदी घातली आहे. २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. १६ एप्रिल रोजी बिहारच्या कटिहार येथील एका निवडणूक प्रचारसभेत नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपविरोधात एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत सिद्धूंना प्रचार करण्यास मनाई केली आहे. या तीन दिवसांत त्यांना कोणत्याही निवडणूक प्रचारसभेला, रोड शोला, कॉर्नर बैठकांना संबोधित करता येणार नाही. तसेच मुलाखतीही देता येणार नाही. शिवाय सोशल मीडियावरूनही निवडणूक प्रचार करता येणार नाही.
यापूर्वी निवडणूक आयोगाने बसपा प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपा नेते आजम खान आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांना दोन ते तीन दिवसांसाठी निवडणूक प्रचार करण्यास मनाई केली होती.