खराब ईव्हिएम “त्याने” जमीनीवर आपटले आणि फोडून टाकले

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) खराब झाल्याने मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. पण आंध्र प्रदेशात मतदानादरम्यान एका उमेदवाराचा पारा इतका चढली की त्याने थेट ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळून फोडून टाकलं. महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम खराब झाल्याने उमेदवार नाराज नव्हता. पोलिसांनी उमेदवाराला अटक केली आहे.
आंध्र प्रदेशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील गुंताकल विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता मतदान कऱण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव योग्य प्रकारे दिलं जात नसल्यावरुन मधूसुदन गुप्ता नाराज होते अशी माहिती मिळत आहे. यावरुन त्यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ जागांसाठी एकत्रित मतदान होत आहे. राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील गुंटाकल मतदारसंघातील गुट्टी येथील मतदान केंद्रावर जनसेनेचे उमेदवार मधुसुदन गुप्ता आले. ईव्हीएमवर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचं नाव व्यवस्थित दिसत नसल्यानं ते मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांवर भडकले. त्यांनी रागानं ईव्हीएम उचलून जमिनीवर आपटले. या घटनेमुळं मतदान केंद्रात काही वेळ गोंधळ उडाला. पोलिसांनी गुप्ता यांना अटक केली आहे.