” आम्ही सत्तेत आल्यानंतर बौद्ध, हिंदू ,शीख वगळता सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देऊ ” अमित शहा यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया

‘आम्ही सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) बंधनकारक करू आणि बौद्ध, हिंदू तसेच शीख वगळता सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देऊ,’ असं धक्कादायक विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे.
शहा यांच्या वक्तव्याचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले असून शहा द्वेषाचं राजकारण करत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहा यांनी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना हे विधान केलं. तसेच भाजपच्या ट्विटर हँडलवरूनही तसा मजकूर पोस्ट करण्यात आला आहे.
शहा यांच्या या विधानावर अभिनेत्री पूजा भट्ट, सोनी राजदान, ओनिर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हे वक्तव्य सांप्रदायिक नसेल तर मला माहीत नाही हे नेमकं काय आहे ? हे विधान समाजात दुफळी निर्माण करणारं नसेल तर मला नाही माहीत हे नेमकं काय आहे ? हे द्वेषाचं राजकारण नसेल तर मला नाही माहीत हे नेमकं काय आहे ? हाच भारत आहे काय ? की धर्मनिरपेक्ष भारताचा विचार हायजॅक करण्यात आलाय,’ अशी टीका पूजा भट्टने केली आहे. तर ‘बऱ्याच काळानंतर मनाला त्रास देणारं भाषण वाचण्यात आलं आहे,’ असं प्रसिद्ध दिग्दर्शक ओनिर यांनी म्हटलं आहे.
‘या पेक्षा आणखी वाईट मी काहीच वाचलेलं नाही. हे लोक म्हणतात त्याप्रमाणे झालं तर केवळ परमेश्वरच भारताची मदत करू शकतो,’ असा संताप अभिनेत्री सोनी राजदानने व्यक्त केला आहे. शहा यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.