काँग्रेस-भाजपमागे जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही : लॉर्ड बुद्धा टीव्हीतर्फे आयोजित चर्चासत्रात सूर

काँग्रेस आणि भाजप हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्यासोबत जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही. त्यामुळे काँग्रेस-भाजपमागे समाजाने फरफटत न जाता स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखविण्याची गरज आहे, असा सूर संविधान चौकात आयोजित चर्चासत्रात निघाला. लॉर्ड बुद्धा टीव्हीतर्फे शनिवारी संविधान चौकात चर्चासत्र आयोजित केले होते. ‘लोकसभा निवडणूक २०१९ आणि आंबेडकरी समाज’ हा या चर्चासत्राचा विषय होता. यासाठी विविध पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडण्यासाठी पाचारण करण्यत आले होते. यात काँग्रेसकडून संजय मेश्राम, भाजपकडून धर्मपाल मेश्राम, बसपाकडून उत्तम शेवडे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे रवी शेंडे उपस्थित होते. यासोबतच नागपूरविद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हेही व्यासपीठावर होते.
लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर यांनी भूमिका विशद केली. ते म्हणाले, नागपूर हा बौद्ध आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु या बालेकिल्ल्याची ताकद अलीकडे निवडणुकीत दिसत नाही. तेव्हा या लोकसभा निवडणुकामध्ये आंबेडकरी समाजाची नेमकी भूमिका काय असावी, यासंदर्भात ही चर्चा घडवून आणली जात असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आपापल्या पक्षाची भूूमिका विशद केली. अनेक विषयांवर नागरिकांनी आपली तीव्र प्रतिक्रियाही दिली. उदाहरणार्थ खैरलांजी विषयावर नागरिकांनी काँग्रेसला धारेवर धरले. खैरलांजी प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी का दिली, असा प्रश्न विचारण्यात आला तर आरक्षण व संविधानाच्या विषयावर लोकांनी भाजपला घेरले.
एक खासदार व एक आमदार मिळविण्यासाठी इतर पक्षांशी युती होऊ नये.
आरक्षण, रोस्टर, पाली भाषेचा विषय, पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्ती आदींसह समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन इतर पक्षांसोबत आघाडी व्हावी, असा सूरही या चर्चासत्रात निघाला.
लॉर्ड टीव्हीचे संचालक सचिन मून यांच्यासह राजू मून, महेश नागपुरे, दत्ताजी गजभिये, अजय डोंगरे, दिनेश सोमकुंवर, कुणाल कांबळे, सिद्धार्थ सोनारे आदी उपस्थित होते.