Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“जय भीम, जय मीम”च्या जल्लोषात आ. इम्तियाज जलील यांची उमेदवारी दाखल

Spread the love

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच उतरणाऱ्या एमआयएमचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांचा बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या मिरवणुकीत ‘जय भीम’चा नारा अधिक बुलंद होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते अससोद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या प्रतिमा असणारी टि-शर्ट तरुणांनी घातले होते. सकाळी भडकल गेट येथून काढलेली ही मिरवणूक अन्य सर्व उमेदवारांपेक्षा अधिक जंगी होती. कार्यकर्त्यांचा उत्साहही अधिक दिसून येत होता.

दलित आणि मुस्लिम मतांच्या गणितावर अवलंबून असणाऱ्या या आघाडीचे उमेदवार नक्की किती आणि कशी मते मिळवतील, याची गणिते आता घातली जाऊ लागली आहेत. केवळ या दोन घटकांवरच आम्ही अवलंबून नाहीत. ओबीसीमधील मोठा वर्ग पक्षाला पाठिंबा देत आहे. आज रॅलीमध्ये उत्साहात अनेक जण सहभागी झाले होते. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी ताकद लावू, असे उमेदवार इम्तियाज जलील यांनी सांगितले. काँग्रेसला निवडून आणण्याचा ठेका मुस्लिम आणि दलित समाजाने घेतलेला नाही. त्यामुळे यावेळी अस्तित्व दाखवून देऊ, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, मिरवणुकीमध्ये मुस्लिम तरुणांपेक्षा जय भीम चा नारा बुलंद करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. गेल्या काही दिवसांपासून दलित वस्तींमध्ये मुस्लिम उमेदवाराला मतदान मिळेल की नाही, अशी चर्चा केली जात होती. त्याला गर्दीने उत्तर दिले असल्याचा उल्लेख कार्यकर्ते करीत होते. वेगवेगळ्या रंगांचे झेंडे, ढोल-ताशे, फटाके, असा मिरवणुकीचा माहोल होता. तरुणांची संख्या अधिक होती. मुस्लिम समाजातील मध्यम वयोगटातील व्यक्तींची संख्या तुलनेने कमी असल्याचे आवर्जून सांगितले जात होते. एकूण मुस्लिम मतदारांपैकी अधिक वयोगटातील व्यक्ती एमआयएमच्या बाजूने झुकणार नाहीत, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. दुपारी अर्ज भरल्यानंतर आमदार इम्तियाज जलील यांची संपत्ती किती याचाही तपशील कार्यकर्ते घेत होते.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या शपथपत्रानुसार आमदार जलील यांच्याकडे ५१ लाख ३४ हजार ७६८ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ९ लाख २८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पुणे येथे निवासस्थान आहे. त्याचबरोबर एक डस्टर कार, १६ लाख रुपयांची टाटा सफारी, एक बुलेट व दोन दुचाकी गाडय़ा त्यांच्याकडे आहेत. स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य एक कोटी ८० लाख रुपये असून पत्नीच्या नावे ५५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. घर बांधणीसाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचा उल्लेख त्यांच्या शपथपत्रात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!