BHU : बनारस हिंदू विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) परिसरात एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे विद्यापीठपरिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. बनारस हिंदू विद्यापीठ परिसरातील बिर्ला हॉस्टेलजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव गौरव सिंह असे आहे. गौरव सिंह हा बिर्ला हॉस्टेलसमोर आपल्या मित्रांसोबत होता. यावेळी दुचारीवरुन आलेल्या व्यक्तींनी गौरव सिंह याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गौरव सिंह गंभीररित्या जखमी झाला. त्याला बनारस बनारस हिंदू विद्यापीठातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गौरव सिंह याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बनारस हिंदू विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून चार आरोपींना अटक केली आहे. व्यक्तिगत वादामुळे गौरव सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गौरव सिंह हा बनारस हिंदू विद्यापीठात एमसीएचे शिक्षण घेत होता. तसेच, लाल बहादुर शास्त्री हॉस्टेलमध्ये राहत होता.