Loksabha 2019 : तुम्ही काँग्रेसला सत्ता द्या , वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देतो : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीयांनी आता सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत या नोकऱ्या देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट महत्त्वाचं मानलं जात आहे. ‘सध्या देशात विविध खात्यातील २२ लाख पदे रिक्त आहेत. आमची सत्ता आल्यास ३१ मार्च २०२० पर्यंत ही सर्वच्या सर्व २२ लाख पदे भरण्यात येतील,’ असं राहुल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य आणि शिक्षणासाठी निधी हस्तांतरीत केला जातो. त्याच्याशी ही सर्व रिक्तपदे लिंक करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, रविवारी विजयवाडा येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. भारताचं संविधान बदलण्याचं मोदी सरकारचं अंतिम ध्येय आहे. कारण आरएसएसचं स्वप्न पूर्ण करण्यात संविधानाचा अडथळा आहे. त्यामुळेच त्यांना संविधान बदलायचं असून काँग्रेस पक्ष हे कदापिही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.