भाजप आणि मोदी मला “पोस्टर बाॅय ” का बनवताहेत : विजय मल्याने का उपस्थित केला प्रश्न

मी बँकांचे 9 हजार कोटी रुपये थकवले होते. त्यामुळे भारत सरकारने माझी 14 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आल्याचे स्वतः मोदींनी सांगितले आहे. असे असतानादेखील भाजप मला टार्गेट का करत आहे? असा सवाल कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे. एका मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने माझ्याकडील कर्ज वसूल केल्याचा खुलासा केलेला आहे, तरिही भाजपचे प्रवक्ते मला सातत्याने का लक्ष्य करत आहेत? असा प्रश्न मल्ल्याने विचारला आहे.
1992 पासून मी ब्रिटनमध्ये राहत आहे, मग मी भारतातून फरार कसा? भाजपचे प्रवक्ते मला पोस्टर बॉय का बनवत आहेत? असे सवाल मल्ल्याने भाजप नेत्यांना आज ट्विटरच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले आहेत.
ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी एक मुलाखत पाहिली, या मुलाखतीत ते म्हणाले की, विजय मल्ल्या बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन फरार झाला आहे. परंतु आमच्या सरकारने त्याची 14 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पंतप्रधानांच्या कबुलीनंतरही भाजपचे प्रवक्ते माझ्या मागे का लागले आहेत?