माढ्याचा तिढा : माढा लोकसभा लढण्यास विजयसिंह मोहिते-पाटील तयार , पक्षाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत

माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील यांना निवडणूक लढविण्याची संधी भाजप देईल या आशेने भाजपमध्ये जाऊनही अद्याप भाजपने निर्णय न केल्यामुळे मोहिते पाटील पिता-पूत्र राजकीय दृष्ट्या चांगलेच अडचणीत आले आहेत . मुलाला तिकीट मिळणार नसेल तर आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे संकेत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज दिले असल्याचे वृत्त आहे. भाजपने पक्षादेश दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल, असे मोहिते पाटील म्हणाले.
माढा येथे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या घरी भेट देण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. माढा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीतील उमेदवारीचा तिढा संपला असला तरी भाजपच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. जो भाजपात प्रवेश करेल त्याच्या नावाची काही काळासाठी उमेदवार म्हणून चर्चाही रंगत आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माढा लोकसभेसाठी भाजपकडून सुभाष देशमुख यांच्या नावाबरोबरच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार असतील, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरही केले होते. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी मुख्यमंत्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. मात्र आज सकाळपासून पुन्हा मोहिते पाटील पिता-पुत्राच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांच्या उमेदवारीने चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ आता भाजपासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. भाजपमध्ये अजूनही उमेदवाराबाबत घोळ सुरू असून कार्यकर्ते गोंधळून गेल्याचे चित्र तयार झाले आहे. मागील चारवर्षांपासून संजयमामा शिंदे यांना माढा लोकसभेसाठी उमेदवार देण्याची तयारी भाजपने केली होती. मात्र, राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना पक्षात घेत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपसमोर प्रश्न निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू आहे.