भाजपकडून माढ्याचा तिढा अद्याप सुटलाच नाही , राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये घेऊनही भाजपकडून माढ्याच्या जागेचा तिढा न सुटल्याने राष्टवादी सोडून तिकिटाच्या आशेने भाजपात गेलेल्या मोहिते पातळ्यांवर नुसतेच भाजपकडे आशेने पाहण्याची वेळ आली आहे . पंतप्रधान मोदींच्या देशहिताच्या कार्याने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये जात असल्याची गर्जना मोहिते पाटलांनी केली होती त्यामुळे त्यांना मोदींच्या कार्यावरच समाधान मानावे लागते कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .
देशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला तरी माढा लोकसभेतील जनतेला माढ्यातील भाजपाचा उमेदवार नेमका कोण ? असा प्रश्न पडला आहे. शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. अनेक राजकीय घडामोडींनंतर माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणारे संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा खुद्द पवारांनीच केली. मात्र, भाजपाकडून अद्यापही उमेदवार ठरला नाही.
दरम्यान संजय शिंदे यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. शरद पवार यांनी माढातून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध करूनही त्यात मोहिते पाटलांचे नाव नसल्याने नाराज झालेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांना ही उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, त्यानंतर साताऱ्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपाच्या गळाला लागले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाकडून त्यांनाच उमेदवारी जाहीर होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र, भाजपाने त्यांचीही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे माढ्याचा तिढा सुटता सुटेना अशी अवस्था झाली आहे.