‘मै लोकसभा लढा तो सब गणित बिगड जायेगा’ म्हणणारे आ . सत्तार बंडखोरी का करताहेत ? हे समजेना : आ . सुभाष झांबड

आ. अब्दुल सत्तार हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनीच माझे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. त्यामुळे मला विश्वासात न घेता झांबड यांना उमेदवारी दिली गेली हा त्यांचा दावा न पटण्यासारखा आहे. पक्षाने त्यांना जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी? यामागे काय राजकारण आहे हे त्यांनीच सांगावे, औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे. पक्षश्रेष्टींना फोन करून सत्तार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मी करतो.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा विषय जेव्हा पक्षात सुरू होता तेव्हा जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांनीच माझे नाव जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने निवडणूक समितीकडे पाठवले होते. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तेव्हा देखील अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पण तेव्हा ‘मै लोकसभा लढा तो सब गणित बिगड जायेगा’, असे म्हणत सत्तार यांनी नकार दिला होता. त्यानंतर जेव्हा केव्हा त्यांच्या नावाची पक्षात चर्चा व्हायची तेव्हा त्यांनी मला लोकसभा लढवायची नाही, असे स्पष्ट केले होते.
औरंगाबादच नाही तर जालना लोकसभा मतदारसंघातून देखील पक्षश्रेष्ठींनी या दोघांना उमेदवारी देऊ केली होती. नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे झालेल्या बैठकीत त्यालाही या दोघांनी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यानंतर जालन्यातून विलास औताडे आणि औरंगाबादसाठी माझी उमेदवारी जाहीर झाली. आता मला विश्वासात घेतले नाही असे जर अब्दुल सत्तार सांगत असतील तर ते योग्य नाही. मग आता माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा का केली हे कोडे मलाही उलगडत नाहीये. यामागे कोणते राजकारण आहे हे खरे तर त्यांनीच स्पष्ट करायला हवे, असे सुभाष झांबड म्हणाले.