संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिमची उमेदवारी तर मिलिंद देवरेंना मुंबईची जबाबदारी : काँग्रेसने सोडवला तिढा

काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहाव्या यादीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरुपम उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वाद मिटविण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री व दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे आता मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. अध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करणाऱ्या निरुपम यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यातच मुंबई काँग्रेसच्या गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या कार्यकरिणीत त्यांनी आपल्या २४ समर्थकांची वर्णी लावली होती. तसेच त्यांच्या विरोधात कामत व देवरा गटांनी व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटांचा कडाडून विरोध होता. निरुपम यांना येथून तिकीट देऊ नये, अशी भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी घेतली होती. त्यातून सुवर्णमध्य काढत काँग्रेसनं मिलिंद देवरांकडेची मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.