मध्यरात्री पहाटे दोन वाजता म्हणे “त्यांनी” बोलावलं आणि “हे” गेले….

औरंगाबादमधून आपल्या मर्जीप्रमाणे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी पहाटे २ वाजण्याच्या सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.
भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी यापूर्वीच केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावल्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलो असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. नाराज अब्दुल सत्तार यांना भाजपकडून काही ऑफर असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सत्तार भाजपत प्रवेश करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आपण लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना याबाबत कळवले असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. काँग्रेसने एकाही अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही याकडेही सत्तार यांनी लक्ष वेधले आहे. मी काँग्रेसचा राजीनामा दिलेला असल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा मला हक्क असल्याचेही अब्दुल सत्तार म्हणाले.
काँग्रेसनं औरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर इथून इच्छूक असलेल्या नाराज अब्दुल सत्तार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला.