पाच वर्षात भाजपचा पाळणा हलला नाही , बाहेरचे उमेदवार घेऊन निवडणूका लढवताहेत : जयंत पाटील

गेली पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण या कालावधीत त्यांना जनमानसाचे प्रेम जिकंता आले नाही. पाच वर्षात भाजपचा पाळणाच हालला नाही. पक्ष वाढला नाही. निवडणुकीत त्यांची सारी भिस्त आयाराम गयारामवर आहे. बाहेरचे उमेदवार घेवून ते निवडणूक लढवत आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनजंय महाडिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काँग्रेस कमिटीत बैठक झाली. भाजप-शिवसेनेच्या संयुक्त प्रचाराची सभा म्हणजे एक इव्हेंट आहे. त्यांनी राज्यात सभेचे असे कितीही इव्हेंट करू देत नागरिक त्यांना भीक घालणार नाहीत, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीय. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने कारभार करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात पुन्हा सत्ता सोपविण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. दोन्ही काँग्रेस एकसंधपणे काम करणार असल्यामुळे खासदार महाडिक हे अडीच लाख मतांनी विजयी होतील, असा दावा पाटील यांनी केला.