तिकीट कापले : अनिल शिरोळे म्हणतात , मी पक्षाचा ऋणी आहे !! तर बापट म्हणाले, ” शिरोळे नाराज नाहीत….”

लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपले तिकीट कापून पुण्यात गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे.यावर प्रतिक्रिया देताना विद्यमान खा. अनिल शिरोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कि , माझ्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांसाठी मी भाजपाचा ऋणी आहे, यानंतरही मी पक्षाचे काम करत राहील . भाजपाने आजवर जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. त्यांनी वेळोवेळी माझ्यावर टाकलेल्या या जबाबदाऱ्यांसाठी मी त्यांचा ऋणी आहे. यानंतरही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षाचे काम करत राहणार. पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असणार, असेही शिरोळे म्हणाले.
खासदार अनिल शिरोळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.
अनिल शिरोळे नाराज नाहीत-गिरीश बापट
संजय काकडे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि अनिल शिरोळे हे नाराज नाहीत असे गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. पुणे महापालिकेपासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता राष्ट्रीय राजकारणात जातो आहे. पुणे लोकसभेच्या जागेसाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र पक्षाने मला संधी दिली असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदार दिली जाणार आहे. त्या प्रश्नावर बापट म्हणाले की, संजय काकडे हे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक असून त्यांची महत्त्वाची भूमिका असेल असेल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, पुणे शहराच्या राजकारणात मागील ४० वर्षापासुन असून शहरातील प्रत्येक घटकांसोबत चांगला संपर्क आहे. तर आता लोकसभेसाठी नावाची घोषणा झाल्याने प्रत्येक भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे. त्याच बरोबर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी देखील जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.