P C Ghose: पी. सी. घोष देशाचे पहिले लोकपाल

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने देशाचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि प्रसिद्ध मानवाधिकार तज्ज्ञ पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज घोष यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. लोकपाल नियुक्तीसोबतच न्यायिक सदस्य व अन्य चार सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायिक सदस्य म्हणून न्या. दिलीप बी. भोसले, न्या. प्रदीपकुमार मोहंती, न्या. अभिलाष कुमारी, न्या. अजयकुमार त्रिपाठी तर अन्य सदस्य म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) माजी प्रमुख अर्चना रामसुंदरम, महेंद्र सिंग आणि इंद्रजीत प्रसाद गौतम यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील लोकपाल नियुक्ती समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घोष यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहिले नव्हते. ‘हे सरकार मनमानी करत आहे’ असा आरोप करत खर्गे यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला होता.