2002 Godhra Riots : गोध्रा हत्याकांडप्रकरणी याकूब पटालियाला जन्मठेप

गुजरातमधील विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने गोध्रा हत्याकांडप्रकरणी याकूब पटालियाला याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बुधवारी झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, अन्य पाच आरोपींच्या साक्षीवरून न्यायालयाने याकूब पटालिया याला शिक्षा सुनावली. गोध्रा हत्याकांड प्रकरणानंतर तब्बल १६ वर्षांनंतर जानेवारी २०१८ मध्ये पोलिसांनी याकूबला अटक केली. साबरमती येथील केंद्रीय कारागृहात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयासमोर हा खटला सुरू होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावणाऱ्या आरोपींमध्ये याकूब सामील असल्याची साक्ष अन्य पाच आरोपींनी न्यायालयासमोर दिली. या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर गुजरातमध्ये दंगल घडली.
विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने मार्च २०११ मध्ये याप्रकरणी ३१ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आणि शिक्षा ठोठावण्यात आली. यामध्ये मृत्युदंडाशी शिक्षा ठोठवलेल्यांपैकी ११ आरोपींची शिक्षा कमी करून जन्मठेप करण्याचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने दिला होता. विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने गेल्या वर्षी फारूक भाना आणि इम्रान शेरी यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.