रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचा उद्या भाजप प्रवेश

भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार असल्याची घोषणा रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यानंतर रणजीतसिंहाच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात जबर धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवरील गरवारे हॉलमध्ये उद्या रणजीतसिंहांचा भाजप प्रवेश होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात माघार घेतल्यानंतरही माढाच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी आज अकलुजमध्ये पत्रकार परिषद घेतली. आपण उद्या दुपारी १२.३० वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं रणजीतसिंह यांनी जाहीर केलं. या पूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला एकमुखाने पाठिंबा दर्शवला.