मोदी आणि अमित शाह यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे, नरेंद्र मोदी अत्यंत खोटारडा माणूस : राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे . मी कोणाकडे जागा मागयला गेलो नाही, मला लोकसभा निवडणूक लढवण्यात काहीही रस नाही. मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे मी मागच्या गुढीपाडव्यालाच बोललो होतो. ही लोकसभा निवडणूक मोदी, शाह यांच्या विरोधात देश अशीच असणार आहे. माझ्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कोण? हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मोदीविरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं आहे ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचं आहे असे जाहीर आवाहन मनसैनिकांना राज यांनी केले . हाँ मै भी चौकीदार या मोहिमेचीही राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. छोटीशी नक्कल करत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला. रंगशारदा या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह नकोत,म्हणून भाजपाला मतदान करू नका असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. लोकसभेची लढाई ही कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह या दोघांच्या विरोधात आहे. त्यांच्या उमेदवारांना मत देऊ नका असे आवाहन राज ठाकरेंनी केले . भाजपाची लोकं तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर घ्या, त्यांनी देश लुटलाय, तुम्ही त्यांना लुटलं तर हरकत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. भाजपाकडून चौकीदार मोहीम राबवली जाते आहे. ही निवडणूक भारताची आहे की नेपाळची? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जाते आहे. खोट्या फोटोंच्या आधारे प्रचार केला जातो आहे आणि मतं मागितली जात आहेत. खोट्या प्रचाराला भुलू नका. नरेंद्र मोदी हा अत्यंत खोटारडा माणूस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यावेळीही त्यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या आणि मोदींवर निशाणा साधला.