लोकसभा २०१९ : बसपा-सपाचे महाराष्ट्रावरही आक्रमण , लढविणार ४८ जागा

ऊत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्र आलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्रावरही आक्रमण करण्याची रणनीती आखली असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. त्याचा मोठा परिणाम अर्थातच सेक्यूलर मतांवर होण्याचीच शक्यता अधिक आहे.
भाजपला रोखण्यासाठी समाजवादी पक्षानं काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, बसपाच्या मायावती या काँग्रेससोबत जाण्यास फारशा उत्सुक नव्हत्या. त्यामुळे अखेर समाजवादी पार्टी आणि बसपानं एकत्र आघाडी करण्याचा निर्णय घेतला.
या नव्या सपा-बसपा आघाडीची अधिकृत घोषणा बसपाचे
महाराष्ट्र प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि सपचे महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष अबू आझमी संयुक्त पत्रकार परिषदेत करतील,
अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली आहे.
सपा-बसपा यांच्याकडून पक्षाची ताकद बघूनच जागावाटप करण्यात येणार आहे. समाजवादी पक्षाकडून मुंबई आणि मराठवाड्यातील जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. तर बसपाकडून संपूर्ण विदर्भात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत. समाजवादीची उत्तर भारतीयांप्रमाणे मुस्लिम मतदारांवर मदार आहे. तर बसपची मदार दलित मतांवर आहे. सपा-बसपाच्या या आघाडीमुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मिळणाच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.