जालना मतदार संघात अर्जुन खोतकर काँग्रेसची कुर्बानी स्वीकारणार , कि स्वतः दानवेंसाठी कुर्बानी देणार ?

जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा .रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढण्याच्या डरकाळ्या फोडणारे राज्यमंत्री अर्जुन खोतकर मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून आल्यानंतरही ” आपण उद्धव साहेबांना जालना मतदार संघाची परिस्थिती समजावून सांगितली असून जालना मतदार संघ सेनेकडे घ्यावा किंवा या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. ” असे सांगून उद्या औरंगाबादेत या प्रश्नाचा निकाल लागेल असे स्पष्ट केले असले तरी खोतकर यांनी आपली तलवार म्यान केल्याच्या चर्चा सुरु झाली आहे .
खोतकरांच्या भूमिकेबद्दल बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ . अब्दुल सत्तार यांनी ” मातोश्रीवर सलाम करायला गेलेले खोतकर गुलाम बनून बाहेर पडले पडले ” अशी खोचक टीका केली असून आज खोतकर यांच्या बाबतीत उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री , दानवे आणि खोतकर यांच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि हा निर्णय खोतकर स्वीकारतात ? का याचे उत्तर आज मिळणार आहे .
दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर खरोखरच लढणार असतील तर जालन्याची जागा कुर्बान करण्याची भूमिका आ . अब्दुल सत्तार यांनी आधीच घेतलेली आहे . आता अर्जुन खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम राहतात कि , जालन्याची जागा पुन्हा एकदा दानवेंना कुर्बान करतात हे आज स्पष्ट होणार आहे .
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे; मात्र जालना लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या जागेसाठी आग्रही आहेत, त्याचवेळी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हेही तिथून लढण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भात आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही.
पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील युतीचे समन्वयक म्हणून जबाबदारी पाहात आहेत. आज शिवसेना-भाजप युतीचा मेळावा औरंगाबादमध्ये पार पडणार आहे, त्याआधी एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार आहे. त्यानंतर जालनाचा वाद मिटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी खोतकर यांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे खोतकर काँग्रेसमध्ये जाणार असल्याचेही बोलले जात होते. पण सध्यातरी असा कोणता निर्णय घेतला नसल्याचे खोतकर म्हणाले.