प्रकाश आंबेडकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आणि सोशल मीडियावरील पोस्ट

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त हा आगामी सण उत्सव होळी, धुलीवंदन ,श्री शिवाजी महाराज जयंती व येणारी लोकसभा निवडणूक २०१९ या पार्श्वभूमीवर दंगा नियंत्रण उपाययोजना अंतर्गत रंगीत तालमीचा भाग होता असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आज दिवसभर प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील घराबाहेरील पोलीस बॅण्डपबस्ताविषयी सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरत होते . ज्या भागात पोलिसांनी हि रंगीत तालीम केली त्या भागात प्रकाश आंबेडकर यांचे निवासस्थान असून त्यांच्या यशवंत या निवासस्थानी शनिवारी सकाळी पोलिसांचा फौजफाटा होता. यावरुन प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता . बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्ट मध्ये म्हटले होते कि , “अकोल्यात बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे घरापुढे अचानक लावलेला पोलिसांचा फौजफाटा आणि शीघ्रकृती दल हा रंगीत तालमीचा भाग आहे असे काही पत्रकार मंडळी सांगत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या घरासमोर अशापद्धतीने कधीही रंगीत तालीम झालेली नाही, थेट घरापुढे पोलीस आणि शीघ्रकृती दलाच्या रांगा लावणे आणि त्याबाबत काहीही सूचना देण्यात आल्या नाहीत. त्या मुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांची शुक्रवारी यादी जाहीर होणे आणि शनिवारी अचानक पोलीस आणि विशेष दल आणले जाणे ह्याबाबत पोलीस विभागाचे वतीने तात्काळ खुलासा आवश्यक आहे”, अशी मागणी केली जात होती.
दरम्यान सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याने या संदर्भात जरी केलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की, शनिवार दिनांक १६ मार्च २०१९ रोजी ११.०० ते १२.३० वा पोलिस स्टेशन सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी सण उत्सव होळी, धुलीवंदन ,श्री शिवाजी महाराज जयंती व येणारी लोकसभा निवडणूक २०१९ संबंधांने दंगा काबू योजना रंगीत तालीम व कर्मचाऱ्यांचे पायदळ पथ संचलन घेण्यात आले .सदर संचलनाची सुरुवात कृषीनगर ,पोद्दार स्कूल ,वृंदावन नगर, जठारपेठ ,लहान ऊमरी ,रेल्वे ब्रिज ,मोठी उमरी शिवाजी पुतळ्यापर्यंत प्रभावी पायदळ पेट्रोलिंग करून समाप्त करण्यात. आले यामध्ये पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे आणि ५१ कर्मचारी , RCP ९० CRPF आणि एक पोलीस निरीक्षक व ५९ कर्मचारी तसेच होमगार्ड असे एकूण ४ अधिकारी व २०० कर्मचारी यात सहभागी झाले होते, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सदर पथसंचलनाचा सविस्तर अहवाल पाठवण्याची तजवीज ठेवली आहे. सदरचे पथसंचलन दंगा काबू योजना ही कोण्या व्यक्तीविरोधात नसून. आगामी सण उत्सव व येणारी निवडणूक संबंधाने पोलिसांनी केलेली नियमित कारवाई आहे .पथसंचलन हे पोलिस खात्यातील दैनंदिन काम असून त्याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये, असे पोलिसांनी म्हटले आहे.