न्यूझीलंड : दोन मशिदीत बेछूट गोळीबार, 49 ठार , बांग्लादेशचा संघही यावेळी मशिदीत होता हजर, सर्व जण सुरक्षित

न्यूझीलंडच्या साऊथ आयलँडवरील ख्राइस्ट चर्च शहरात आज सकाळी दोन मशिदींमध्ये अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला असून या हल्ल्यात 49 जण ठार, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या बांग्लादेशी संघाला मात्र सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यांनी आजचा दिवस न्यूझीलंडच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं जाहीर केलं आहे. हिंसेला न्यूझीलंडच्या भूमीवर थारा नाही, अशा शब्दांत त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत हा गोळीबार सुरू झाल्याची माहिती ए एन आय ने दिली आहे. शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या मशिदीत येत असतात. त्यामुळे मशिदीत गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत काळे कपडे आणि हेल्मेट घालून एक अज्ञात इसम अल नूर मशिदीत शिरला. कोणालाही कळायच्या आत त्याने बेछूट गोळीबार सुरू केला. क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आलेल्या बांग्लादेशचा संघ यावेळी मशिदीत हजर होता. संघातील सर्व खेळाडूंना मागच्या दाराने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
लिनवूड येथील मशीदीतही काही हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत तर अधिक २० हून अधिक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटकही केली आहे. या हल्लेखोरांकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि इतर ज्वलनशील उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.