प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ राजू शेट्टी यांचीही आघाडीला जाहिर फारकतीची नोटीस

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ, आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला ३ जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात १५ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिला.
पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी 3 जागा सोडाव्यात, यामध्ये बुलडाणा येथील राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा तर वर्धा येथील काँग्रेस कोट्यातील जागा सोडण्यात यावी. तर हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आही. जी जागा आमचीच आहे ती देण्याचा प्रश्नच नाही असं शेट्टी यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अनेक प्रस्ताव आले मात्र वर्धा, बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत. वर्धा मतदारसंघातून माजी मंत्री सुबोध मोहिते तर बुलडाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही उद्यापर्यंत अल्टीमेटम देतो, आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १५ जागांवर उमेदवार उभे केले जातील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.