loksabha 2019 : सोशल मीडियावर प्रचार करताय ? जरा जपून …

देशातील सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेऊन सोशल मीडियावरील पोस्ट , प्रचार निवडणूक आयोगाने या निवडणुकीत गांभीर्याने घेण्याचे ठरविले असल्याने आपण सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करणार असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे अन्यथा हा खर्च उमेदवाराच्या खर्चात जाईल असे निवडणूक आयोगाने सुचविले आहे . मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत खूप बदल करण्यात आले आहेत. यंदा सर्व इव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा असणार आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. ‘सर्व उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा तपशील देणं बंधनकारक करण्यात आलं आहे,’ अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. याशिवाय सोशल मीडियावर जारी होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींसाठी आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. गुगल, फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब सारख्या सोशल मीडिया हाताळणाऱ्या कंपन्यांना राजकीय पक्षांकडून मिळणाऱ्या जाहिरातींची खातरजमा करून घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने या कंपन्यांना दिल्या आहेत.
सोशल मीडियावरील व्यासपीठांवर जारी होणाऱ्या जाहिरातींशी संबंधित तक्रारींच्या सुनावणीसाठी निवडणूक आयोग एका अधिकाऱ्याचीही नियुक्ती करणार आहे. अरोरा म्हणाले, ‘सोशल मीडिया व्यासपीठावर जारी झालेल्या जाहिरातींचा खर्च उमेदवाराच्या एकूण खर्चात जोडला जाणार आहे म्हणून जराजपून….