इम्रान खान यांना शांततेचे नोबेल देण्याची पाक संसदेची मागणी

भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाऊल उचलल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी पाकिस्तान सरकारनं केली आहे. तसा प्रस्तावच पाकच्या संसदेत आणला गेला आहे. पुलवामा हल्ल्यात पाकपुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’चा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतीय हवाई दलानं कारवाई करून तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. त्यानंतर पाकनंही भारताच्या हद्दीत लढाऊ विमानं घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न हाणून पाडताना भारताचं मिग-२१ हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं. या विमानातील पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले होते. पायलट अभिनंदन यांना मारहाण झाल्यामुळं तणाव आणखी वाढला होता. पाकिस्ताननं हवाई हद्दीचं उल्लंघन केल्यामुळं भारताकडून लष्करी कारवाईची शक्यता होती. पंतप्रधान मोदी यांनी तसे संकेत दिले होते. त्यामुळं बिथरलेल्या इम्रान खान यांनी शांततेचं आवाहन करत भारतीय पायलटला सुखरूप सोडण्याची घोषणा केली. त्यानुसार काल अभिनंदन हे भारतात दाखल झाले. दोन्ही देशातील शांततेसाठी इम्रान खान यांनी हे पाऊल उचलल्याचं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे. पाकचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत प्रस्ताव आणताना हीच भूमिका मांडली. इम्रान यांनी शांततेसाठी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे, असं चौधरी म्हणाले.