वीरयोद्धा निनादच्या वीर पत्नी विजेता यांचा फेसबुक्यांना संदेश … “इतका जोश असेल तर सीमेवर जा …”

‘सोशल मीडियावर रोज ‘युद्ध’ लढणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की यातून काहीच साध्य होणार नाही. तुमच्यात एवढाच ‘जोश’ असेल तर सीमेवर लढायला जा म्हणजे खरी परिस्थिती कळेल,’ अशा शब्दांत शहीद पायलट निनाद मांडवगणे यांच्या पत्नी विजेता यांनी सोशल मीडियावरील ‘वाचाळवीरांना’ झापलं आहे.
‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानातील तळांवर भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत पळवून लावले. पण यामध्ये भारताची दोन मिग २१ विमानं कोसळली. एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले तर दुसरे भारतातील काश्मीरमधील बडगाममध्ये कोसळले. या अपघातात स्क्वॉर्डन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. त्यांच्या मृत्यूमुळं मांडवगणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पतीच्या मृत्यूबद्दल बोलताना विजेता मांडवगणे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे, असं त्या म्हणाल्या. याचवेळी त्यांनी सोशल मीडियावर युद्धाच्या गप्पा मारणाऱ्यांना सुनावले. ‘युद्धाचे परिणाम भयाण असतात. आम्हाला युद्ध नकोय. हे सगळं थांबायला हवं. यापुढं दोन्ही देशातील एकाही निनादचा बळी जाता कामा नये,’ असं त्या म्हणाल्या. महिनाभरापूर्वीच निनाद यांचे काश्मीर येथे पोस्टिंग झाले होते. ‘बदली झाल्यापासून ते नित्य माझ्या संपर्कात होते. मुलगी वेदिताशीही ते रोज बोलत असतं. २० फेब्रुवारीला वेदिताला त्यांनी दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यांचा बराच वेळ मुलीशी बोलण्यातच जात असे,’ अशी आठवणही विजेता यांनी सांगितली.